देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता दीड लाख पार तर मृत्यूदरात घट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा दीड लाख पार पोहोचला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, देशाचा रिकव्हरी रेट 41.60 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ताजी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंगळवारी २४ तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६३८७ ने वाढली आहे. तर एका दिवसांत एकूण १७० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. आरोग्य मंत्रालयाच्या या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात एक लाख 51 हजार 767 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, 4387 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 64 हजार 425 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

मृत्यूदरात घट
आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात देशात काही प्रमाणात घट आली आहे. जवळपास ३.३ टक्क्यांवरुन आता मृत्यूदर २.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. जागतिक स्तरावरील कोरोना रुग्णांच्या मृत्यूदराशी तुलना केल्यास भारताच्या दरात बरीच तफावत आहे. ही बाब अतिशय दिलासादायक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे येत्या काळात घटणाऱ्या या मृत्यूदराचा आकडा आणखी कमी होऊन कोरोनावर मात करण्यात देश यशस्वी ठरेल याबाबत सारेच आशावादी आहेत.

महाराष्ट्रात काल 2 हजार 091 कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. तर 1168 रुग्ण बरे झाले. तर दिवसभरात सर्वाधिक 97 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 54 हजार 758 वर पोहोचला आहे. त्यातील 16 हजार 954 रुग्ण बरे झाले. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 36 हजार 004 रुग्ण आहेत. तर मृतांचा आकडा 1792 वर पोहोचले आहेत.

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आहे 30.96 टक्के एवढा आहे. तर एकट्या मुंबई शहरात 32 हजार 974 कोरोनाबाधित असून त्यातील 1065 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये 936 रुग्ण असून त्यातील 542 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रिकव्हरी रेट 56.28 टक्के एवढा आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांत केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 56 टक्क्यांवर आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment