नवी दिल्ली । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने सर्व राज्यांचे अर्थकारण ठप्प पडलं आहे. याचा आर्थिक फटका राज्यांना बसत आहेत. म्हणूनच लॉकडाउनमुळे थांबवेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारने काही गोष्टींना लॉकडाउनमधून सवलत दिली आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या सुधारित निर्देशानुसार आजपासून नागरिकांच्या गरजांचा विचार करून काही अत्यावश्यक व गरजेच्या सेवांसाठी सूट देण्यात आली आहे. ही सूट फक्त ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये देण्यात आली आहे. रेड झोनमध्ये मात्र लॉकडाउनची सर्व बंधने लागू असणार आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरवण्यात आलेल्या विभागांमध्ये कोणतीही सुट देण्यात येणार नाही. या विभागांमध्ये आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निर्देशांचं पालन करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आपल्या घराबाहेर पडता येणार नाही. तसंच जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा करण्यात येणार आहे.
या गोष्टींना लॉकडाऊनमधून देण्यात आली सूट
१) अतिअत्यावश्यक सेवा- रुग्णालये, दवाखाने, औषधांची दुकाने, वैद्यकीय प्रयोगशाळा, वैद्यकीय संशोधन, औषध उपचार विषयक विक्री व पुरवठा करणारी दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने-रुग्णालय-औषध विक्री ठिकाणे, रुग्णवाहिका व रुग्णवाहिकेशी संबंधित बाबी, औषध गोळ्या निर्मितीशी संबंधित बाबी, मत्स्योत्पादन, रुग्णालय वा वैद्यकीय पायाभूत सुविधांशी संबंधित बांधकाम इत्यादी बाबींचा समावेश आहे.
२) महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या बाबींशी संबंधित खाती व तेथील संबंधित कर्मचारीवर्ग,
३)बँक, सेबी, इन्शुरन्स
४)पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, एलपीजी, सीएनजी, पीएनजी इत्यादी इंधन विषयक बाबींशी संबंधित
५)प्रसारमाध्यम, केबल सर्विसेस, डायरेक्ट टू होम, डेटा व कॉल सेंटर इत्यादींशी संबंधित बाबी. हे कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने चालवणे अपेक्षित.
६)ई-कॉमर्स विषयक बाबी
७)गॅरेज आणि धाबे – ट्रक दुरुस्तीची दुकाने, महामार्गावरील धाबे सुरु करण्यास परवानगी.
८)वृद्धाश्रम, महिला आश्रम, बालकाश्रम, अनाथ आश्रम, निरीक्षण गृह इत्यादींचे दैनंदिन कामकाज चालू राहण्यासाठी आवश्यक त्या सर्वबाबी
९)दैनंदिन गरजांच्या अनुषंगाने आवश्यक त्या वस्तूंची मालवाहतूक
१०)किराणा दुकान, भाजीविक्रेते, दूध विक्रेते, रेशन दुकान इत्यादी.
११)५० टक्के कर्मचाऱ्यांसहित आयटी आणि आयटीसंबंधित सेवा
१२)कमीत कमी मनुष्यबळासहित डेटा आणि कॉल सेंटर्स
१३)मनरेगा – सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन मजुरांना ही कामं करता येतील.
सेवा सुरु करताना घातलेल्या ‘अटी’
१)अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनी प्रवास करताना चारचाकी वाहन असल्यास यातून चालकाव्यतिरिक्त एका व्यक्तीस प्रवास करण्याची परवानगी, तर दुचाकी वाहनावरून केवळ एकाच व्यक्तीस प्रवास करण्याची परवानगी. बस असल्यास त्यातून बसच्या एकूण क्षमतेच्या ३० टक्के क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी.
२)काम करण्याच्या ठिकाणी, कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सींग पाळणे बंधनकारक. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर त्यांचा वापर करणे देखील बंधनकारक.
३)ज्या ठिकाणी शिफ्टमध्ये काम चालते, त्याठिकाणी दोन शिफ्टमध्ये किमान एक तासाचे अंतर आवश्यक
४)लिफ्टमधून एकावेळी दोन ते चार व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करण्याची अनुमती नाही. तसेच, जिन्याचा वापर करण्यास कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे. ज्या ठिकाणी शिफ्टमध्ये काम चालते, त्याठिकाणी दोन शिफ्टमध्ये किमान एक तासाचे अंतर आवश्यक
५)लिफ्टमधून एकावेळी दोन ते चार व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करण्याची अनुमती नाही. तसेच, जिन्याचा वापर करण्यास कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे.
६)कार्यालय किंवा औद्योगिक आस्थापना इत्यादी ठिकाणी असणाऱ्या लिफ्ट, प्रसाधनगृहे, कॅन्टीन, प्रवेश द्वार, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे निर्जंतुक करणे आवश्यक
७)सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एका ठिकाणी जमण्यास मनाई. पाच व्यक्तींपर्यंत देखील सोशल डिस्टन्सींग पाळणे बंधनकारक.
८)विवाह वा तत्सम समारंभ हे परवानगीनेच मर्यादित स्वरूपात आयोजित करता येणार
९)गुटखा तंबाखू इत्यादी बाबींच्या विक्रीवर पूर्णपणे प्रतिबंध, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा गुन्हा
अटी न पाळल्यास होणारी शिक्षा
१)संसर्गजन्य आजार प्रतिबंधाच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे परिपूर्ण पालन न केल्याचे आढळून आल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंपनी, औद्योगिक संस्था, भागीदारी संस्था, व्यवसायिक संस्था इत्यादींचे संचालक / मालक / सचिव / संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होणार.
२)संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंध कार्यवाहीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या किंवा तसा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन कारवाई होणार. २ वर्षांंपर्यंत कैदेच्या शिक्षेची तरतूद.
या सेवा, स्थळ अजूनही राहणार बंद
लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात ट्रान्सपोर्ट सेवा मात्र बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शाळा आणि महाविद्यालयंही बंद ठेवण्यात येणार आहेत. ज्यांना यातून सुट देण्यात आली आहे त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. चित्रपटगृहे, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल आणि बार ३ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त शैक्षणिक संस्थानं, कोचिंग सेंटर, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानसेवा, रेल्वे सेवा ३ मे पर्यंत बंद राहतील. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, तसंच दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या बस, मेट्रो सेवा ३ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त सामाजिक, राजकीय, खेळ, धार्मिक कार्य, धार्मिक स्थळं, पूजा स्थळं ३ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”