३ मेनंतर मुंबई, पुणे, ठाण्याची लॉकडाऊनमधून सुटका नाहीच- उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३ मे रोजी संपत असून यानंतर लॉकडाउन वाढवला जाणार की शिथील करणार यासंबंधी चर्चा सुरु आहे. अशा वेळी लॉकडाउनमधून मुंबई, ठाणे, पुणेकरांना दिलासा दिला जाणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना दिले. ३ मेनंतर राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे हे रेड झोन वगळता इतर झोनमध्ये परिस्थिती पाहून आतापेक्षा अधिक मोकळीक दिली जाईल. लॉकडाऊनमध्ये अधिक शिथिलता दिली जाईल, असं सांगतानाच पण ही शिथिलता देताना कोणतीही घाईगडबड करण्यात येणार नाही. तुम्हीही मोकळीक दिल्यानंतरही काळजी घ्यायची आहे. नाही तर आजवर केलेल्या तपश्चर्येवर पाणी फिरेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिनी जनतेशी संवाद साधताना हा खुलासा केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणले की, “३ मे नंतर काय करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही काय करायचं ? किती वेळ घरी बसायचं ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अर्थचक्र रुतलं आहे. बेरोजगारी वाढणार असं सांगितलं जात आहे. हे खऱं आहे, नाही असं म्हणणं योग्य नाही. पण अर्थासोबत संपत्ती जर म्हणाल तर प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची महत्त्वाची आणि खऱी संपत्ती त्यांची जनता असते. त्यांना प्राथमिकता दिली पाहिजे. नागरिक वाचले पाहिजेत. ते सैनिक आहेत. ते वाचले तर हा गाडा चिखलातून काढून पुढे नेऊ शकतो”.असं उद्धव ठाकरे यांनी बोलतांना आपलं मत मांडलं.

”रेड झोन म्हणजे जागृत ज्वालामुखी, ऑरेंज झोन म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी आणि ग्रीन झोन म्हणजे तो ज्लालामुखी पुन्हा पेटेल असं वाटत नाही. पण ग्रीन झोनमध्ये जर कोणी कोरोना रुग्ण आला तर पुन्हा हाहाकार माजू शकतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. रेड झोनमध्ये मुंबई आणि मुंबईचा परिसर आहे. कल्याण आणि पनवेलपर्यंत जो काही परिसर येतो तो आहे. पुणे आणि आजुबाजूचा परिसर तसंच नागपूरमधील काही ठिकाणं आहेत. या ठिकाणी आकडे वाढत आहेत. त्यामुळे काही करणं हिताचं नाही. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या ठिकाणी लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“ऑरेंज झोनमध्ये म्हणजे जिथे संख्या वाढत नाही आहे पण अजूनही रुग्ण आहेत तिथे काही परिसर सोडले तर उरलेल्या जिल्ह्यात काय सुरु करु शकतो याचा निर्णय झाला आहे. ग्रीन झोनमध्ये आपण आधीच शिथिलता आणत आहोत,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. “तसंच परराज्यात जे जाऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यांच्यासाठी आपण सोय करत आहोत पण लगेच झुंबड करु नका. अन्यथा ती परवानगीही काढून टाकली जाईल,” असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

Leave a Comment