मुंबई । मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची तसंच मृतांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या दोन शहरांमधील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल मंगळवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर लॉकडाऊन १५ एप्रिल रोजी उठणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई-पुण्यातील कोरोनाबाधितांचे वाढते आकडे पाहता या शहरातील लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढवावा असं मत बऱ्याच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेत व्यक्त केलं. इतिहासात पहिल्यांदाच काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काही कॅबिनेट मंत्री हे त्यांच्या शासकीय निवास्थान ‘वर्षा’वर उपस्थित होते. तर काही जण मंत्रालय आणि उर्वरित आपापल्या मतदारसंघातून बैठकीला हजर होते.
दरम्यान, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत असा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. मात्र, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधील लॉकडाऊन तूर्तास कायम ठेवला जाणार असून, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा कमी आहे, तिथे लॉकडाऊनचे नियम शिथील केले जावे यावर बऱ्याच मंत्र्यांचं एकमत आहे. परंतु नियम जरी शिथील केले तरी जिल्हाबंदी कायम ठेवावी असं मत सर्वांचं मंत्र्यांचं होतं. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता येत्या काही दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचे मुख्य केंद्रबिंदू बनलेल्या मुंबई आणि काही शहरांमधील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढू शकतो असेच संकेत कालच्या मंत्रिमंडळ बैठकीतून मिळत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”