जिनेव्हा । जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातलं आहे. या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी हर्ड इम्यूनिटी तयार व्हायला हवी असं मत अनेक वैज्ञानिकांनी व्यक्त केलं होतं. हर्ड इम्यूनिटी म्हणजेच लोकसंख्येचा मोठा भाग हा कोरोनाने संक्रमित व्हायला हवा. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याबाबत धोक्याची सुचना दिली होती. याशिवाय जगभरातील ८० वैज्ञानिकांनी, तज्ज्ञांनी हर्ड इम्यूनिटीचा अवलंब जीवघेणा ठरू शकत असल्याचे सांगितले आहे.
आरोग्य संशोधन नियतकालिक लॅसेंटमध्ये प्रकाशित झालेल्या एका माहितीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर ८० वैज्ञानिक आणि संशोधकांनी हर्ड इम्यूनिटीबाबत एक जाहीर पत्र लिहिले आहे. या पत्रात नमुद केलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी हर्ड इम्युनिटीचा अवलंब करणं कितपत सुरक्षित आहे याबाबत पुरावे नाहीत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाला रोखण्यासाठी निर्णायक आणि तात्काळ उपायांचा अवलंब करायला हवा.
हर्ड इम्यूनिटीपेक्षा लसीकरण सुरक्षित
लॅसेंटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन केल्यामुळे आणि इतर समारंभ रोखल्यामुळे संक्रमणाचा वेग अनेक ठिकाणी कमी झाला आहे. तर काही देशात कोरोनाची संक्रमणाची दुसरी लाट आलेली दिसून येते. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हर्ड इम्यूनिटीच्या उपायाचा अवलंब करणं फायद्याचे ठरणार नाही. हर्ड इम्यूनिटी अशी प्रक्रिया आहे. ज्यामध्ये मोठ्या समुहाला आजाराचं संक्रमण झाल्यामुळे आजाराशी लढत असलेल्या एंटीबॉडीज तयार होतात. एंटीबॉडी तयार करण्याची हीच क्रिया लसीकरणाच्या माध्यमातूनही होऊ शकते. तज्ज्ञांनी सांगितले की, हर्ड इम्यूनिटीचा धोका पत्करण्यापेक्षा लसीची वाट पाहणं योग्य ठरेल.