मुंबई । राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात पोलीस दिवसरात्र डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहेत. स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता पोलीस सेवा बजावत आहेत. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांनावरही कोरोनाने आता झडप घातली आहे. मुंबईत एका ५७ वर्षीय करोनाबाधित पोलीस कॉन्स्टेबलचा आज नायर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनामुळे पोलिसाचा झालेला हा पहिलाच मृत्यू आहे.
वाकोला येथे ड्युटीवर असलेल्या सदर कॉन्स्टेबलला २२ एप्रिल रोजी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हे पोलीस कॉन्स्टेबल वरळी येथे वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. आतापर्यंत राज्यात ९६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात १५ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यात आता करोनाची लागण होऊन मुंबईत पोलिसाचा मृत्यू झाल्याने पोलीस दल हादरलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”