कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
घारेवाडी (ता. कराड) येथे शिवम् आध्यत्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या 22 व्या युवा हृदय संमेलनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. डॉ.राधाकृष्णन पिल्लई (कार्पोरेट चाणक्य), प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख, कराड अर्बन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. चाणक्यावर 21 पेक्षा जास्त पुस्तक लिहणारे यशस्वी नेतृत्व डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांनी “यशस्वी जीवनावर चाणक्य नीती” यावर मार्गदर्शन केले.
यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक दत्तात्रय देसाई, उद्योजक यतीन सावंत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष महेश मोहिते, सचीव प्रताप भोसले, खजीनदार प्रताप कुंभार, दत्तात्रय पवार, सचिन पाटील, गोकुळ डेअरीचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, विश्वनाथ खोत, चंद्रकांत गायकवाड, धनंजय पवार, देवेंद्र पिसाळ, दत्तात्रय पवार, महेश नलवडे, पुणे, कोल्हापुर, भोगावती, उस्मानाबाद, बारामती विभाग प्रमुख आदींच्या उपस्थितीत झाले. सातारा, पुणे, बारामती, इस्लामपूर, सांगली, बुलढाणा, उस्मानाबाद, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातून हजारो संख्येने युवावर्ग उपस्थित झाला आहे.
श्री. पिल्लई म्हणाले, प्रत्येक भारतीयात चाणक्य आहेत. तुम्हाला मेहनत करायला पाहिजे. अभ्यास करायला पाहिजे. पैसे कमविण्यासाठी चांगले नेतृत्व असणे गरजेचे आहे. तुम्ही कुठेही असाल तरीही वल्ड क्लास कंपनी सुरू करू शकता. यशस्वी झाल्यानंतर ज्यांनी आपल्याला मदत केलेली असते, त्यांना विसरू नका. मागे वळून बघा, आपला गाव, घर विसरू नका. स्वतः ला घडवणारा मी स्वतः आहे. Zoho ही कंपनी अमेरिकेत सुरू करण्यात आली होती. परंतु या कंपनीच्या मालकाने परदेशातून थेट आपल्या गावाकडे ही कंपनी आणली आहे. सध्या या कंपनीचे हेडक्वार्टर तामिळनाडू येथील एका गावात असून तेथे जवळपास 5 हजार साॅफ्टवेअर इंजिनिअर काम करत आहेत. आपण गावाकडून शहराकडे तेथून परदेशात असा प्रवास करण्याचे स्वप्न पाहतो. परंतु यशस्वी लोक आता उलटा प्रवास करत असून गावाकडे येत आहेत. प्रास्ताविक राहुल पाटील यांनी केले. सुत्रसंचलन विठ्ठल मोहिते यांनी केले. शिवम प्रतिष्ठान घारेवाडी यांच्या बालभावसरीता वाद्यवृंद यांच्या सृजनधारा भूपाळी ते अंगाई यांच्यावतीने निरनिराळ्या गीतांचा आविष्कार सादर करण्यात आला.