औरंगाबाद – महानगरपालिकेच्या वतीने चालू आर्थिक वर्षातील आठ महिन्यांच्या कालावधीत मालमत्ता आणि पाणीपट्टी कराची मिळून एकूण तब्बल 81 कोटी 78 लाख रुपयांची वसुली करण्यात आली असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे. यामध्ये मालमत्ता कराचे 63 कोटी 89 लाख तर पाणीपट्टीचे 17 कोटी 79 लाख रुपयांचा समावेश आहे. वसुली ची सरासरी टक्केवारी 14.75 इतकी आहे.
कोरोना संसर्गामुळे नागरिकांना आर्थिक त्रास होऊ नये म्हणून महापालिकेने कर वसुलीकडे लक्ष दिले नव्हते. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटे नंतर मनपा प्रशासन आस्तिक कुमार पांडेय यांनी कर वसुलीकडे विशेष लक्ष दिले. व्यवसायिक मालमत्ताधारकांकडून कराच्या वसुलीला प्राधान्य देण्यात आले. कर वसुलीच्या कामासाठी भरारी पथके स्थापन केली असून वार्ड कार्यालयांचे पथकही वसुलीसाठी घरोघरी जात आहे. मनपाचे कर निर्धारक व संकलन अधिकारी तथा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी देखील कर वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कर वसुलीसाठी धडक कारवाई केली जात असल्याने वसुलीही वाढत आहे. व्यावसायिक मालमत्ता कडील थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथक नियुक्त केले आहेत.
मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट 468 कोटी 54 लाख रुपयांचे देण्यात आले आहे, तर आतापर्यंत 63 कोटी 89 लाख रुपयांची वसुली झालेली आहे. पाणीपट्टीचे 108 कोटी 57 लाख रुपयांचे उद्दिष्ट असून त्यापैकी 17 कोटी 89 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. मागील वर्षी आज पर्यंत 49 कोटी 80 लाखांची वसुली झालेली होती. या वर्षीही वसुली 63 कोटी 89 लाख इतकी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वसुली 14 कोटी 3 लाख रुपयांनी वाढली आहे.