औरंगाबाद – महापालिकेच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव गेल्या १० ते १२ वर्षांपासून धूळखात पडला आहे. मात्र प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी प्रशासकीय इमारतीचा विषय ऐरणीवर घेतला आहे. इमारतीसाठी जागेचा शोध घेतला जात आहे. महापालिकेने पद्मपुरा येथे पाच एकर जागा आरक्षित केली आहे. मात्र या जागेचा न्यायालयात वाद सुरू आहे. त्यामुळे शहरात इतरत्र जागांचा शोध घेतला जात आहे. त्यात शासकीय जागा मिळू शकतात काय याची चाचपणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेचा कारभार गेल्या ३८ वर्षापासून जुन्या इमारतीमधून सुरू आहे. नगरपरिषदेचे १९८२ मध्ये महापालिकेत रूपांतर झाले. त्यावेळी ऐतिहासिक टाऊन हॉल येथे सर्वसाधारण सभा इतर बैठका होत. ही जागा अपुरी पडत असल्याने महापालिकेने विस्तारित इमारत उभारली. टप्पा दोन, तीन अशा इमारती उभारण्यात आल्या. मात्र शहराचा वाढता विस्तार पाहता ही इमारत महापालिकेला अपुरी पडत आहे.
दरम्यान महापालिकेने पदमपुरा येथे पाच एकर जागा प्रशासकीय इमारतीसाठी आरक्षित केली होती. मात्र या जागेचा वाद न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे शहरात इतर ठिकाणी महापालिकेला जागा मिळू शकते काय याची चाचपणी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सुरू केली आहे. त्यात सरकारी जागांचा देखील समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान पदमुरा येथील जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया महापालिकेने पूर्ण केलेली आहे. या जागेचा वाद सध्या न्यायालयात सुरू असला तरी प्रशासनाने प्रयत्न केल्यास हीच जागा मिळू शकते, असे सूत्रांनी सांगितले.