सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
कोरोनाच्या पहिल्या दोन साथीच्या काळात कोरोना साहित्य खरेदीत प्रशासनाने मोठा भ्रष्टाचार केला आहे. सध्या जिल्ह्यात अवैध धंदे, शासकीय जमिनींची परवानगीने विक्री जोरात सुरु असल्याचा आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला. जत येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास परवानगीने उभारा, असा आदेश पुतळा समितीस दिला.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले,”जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे पुतळे बसवले आहेत. तासगावसह जिल्ह्यात आठ ठिकाणी जिल्हाधिकार्यांच्या काळात पुतळे बसवले आहेत. त्यावेळी त्यांना नियमांची आठवण झालेली नाही. नियमाप्रमाणे चालणार्या प्रशासनाने कोरोनाच्या पहिल्या दोन साथ काळात आरोग्य विभागाच्या सहकार्यांने मोठे गैरव्यवहार केले आहेत. त्यांतील वस्तुची खरेदीची किंमत तीन-चार पटीने दाखवलेली आहे.”
“याबाबत राज्य शासनाने चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. जिल्ह्यात महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या वरदहस्ताने मटका, गुटका, हातभट्टी धंदे जोरात सुरु आहेत. रोज कोट्यवधीची माया जमवली जात आहे. याला पोलिसप्रमुखांसह जिल्हाधिकारी यांची भूमिका कारणीभूत आहेत.” तसेच जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने अनेक शासकीय जमिनींची विक्री सुरु झालेली आहे. या प्रकरणीही प्रशासनातील प्रमुख अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.