“झोप नक्की कोणाची उडणार ते चार वाजण्याच्या आधीच कळेल”; भाजप नेत्याचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती दिली आहे. यावरून भाजप नेते प्रसाद लाड यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. “राऊत यांना एकच गोष्ट सांगतो की, भाजप असल्या खोट्या धमक्यांना घाबरणारा पक्ष नाही. ईडीचे कारवाईच्या बाबतीत जे धाडसत्र चालू आहे, त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची झोप उडणार आहे. कोणाची झोप उडणार ते चार वाजण्याच्या आधीच राऊत यांना कळेल, असा टोलाही यावेळी लाड यांनी लगावला.

भाजप नेते प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यामुळे राऊत यांनी स्व:ताची झोप वाचवावी असा टोला देखील लाड यांनी राऊतांना लगावला. तसेच राऊत साडेतीन नावाचा चित्रपट काढणार का? हे बघावं लागेल. भारतीय संविधानामध्ये जे तपास यंत्रणांना अधिकार दिले आहेत, त्यानुसार त्या यंत्रणा काम करत आहेत.

दिलेल्या अधिकारानुसार यंत्रणा काम करत असतील. जर ती यंत्रणा एखाद्या राजकीय पक्षांपर्यंत पोहोचत असेल तर ती तपास यंत्रणा चुकीचे काम करते का? राज्यातील पोलीस भाजपच्या लोकांना त्रास देते. तुम्ही जर चुकीची कृत्ये करत नसाल तर तुम्हाला घाबरायची कारण काय? आम्ही घाबरत नाही, असेही यावेळी लाड यांनी म्हंटले.

काय म्हणाले आहेत संजय राऊत

आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या साडेतीन नेत्यांना जेलमध्येही जावे लागणार असे म्हंटले आहे. आम्ही खूप सहन केल्यामुळे आता बरबादही आम्हीच करू, असा इशारा राऊत यांनी दिला. आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात संजय राऊत यांच्याकडून पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी नावे जाहीर करणार आहेत.