औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात क्षुल्लक कारणावरून खुन, मारहाण होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. रिक्षातून प्रवास करताना सिगारेट पेटवू नको, असे सांगितल्याने रिक्षाचालक व त्याच्या भावांनी प्रवासी दाम्पत्याला शिवीगाळ करून मारहाण संतापजनक घटना शनिवारी सायंकाळी सिडकोतील काळा गणपती मंदिरासमोर घडली.
याविषयी अधिक वृत्त असे की, हर्सूल ते वसंतराव नाईक चौक (सिडको चौक) रस्त्यावर शनिवारी सायंकाळी रिक्षातून सिडको चौकाकडे जाण्यासाठी एक दाम्पत्य रिक्षाचालक विकी जयवंत गायकवाड (वय 21, रा. फातेमानगर, हर्सूल) याच्या रिक्षात बसले. या रिक्षात आधीच अजय जयवंत गायकवाड (19) आणि दिनकर गायकवाड हे रिक्षाचालकाचे दोन भाऊ बसलेले होते. रिक्षा काही अंतरावर जाताच दिनकरने सिगारेट पेटविली, त्यामुळे सदर महिलेने सिगारेट पिऊ नका, धुराचा त्रास होतो असे सांगितले.
त्यामुळे वाद होऊन रिक्षाचालक व त्याच्या दोन भावांनी दाम्पत्याला मारहाण केली. अजयने महिलेच्या पतीला दगडाने मारून जखमी केले. भोला चौकात रिक्षा थांबल्यानंतर नागरिक गोळा झाले. त्यानंतर नागरिकांनी आणि महिलेच्या पतीने तरुणांची चांगलीच धुलाई करीत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले.