करोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात मोदी सरकार अपयशी; मुंबई हायकोर्टाने फटकारलं

modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : लसीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने अनेकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. मात्र आता मुंबई हायकोर्टाने देखील कोरोना परिस्थितीवरून केंद्र सरकारला फटकारले आहे. करोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. लवकर निर्णय घेतले असते तर अनेक जीव वाचवता आले असते असंही यावेळी कोर्टाने सांगितले. मुंबई हायकोर्टात केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि महापालिकेला घरोघरी जाऊन ७५ वर्षांपुढील तसंच अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचं लसीकरण करण्याची सूचना देण्याची मागणी करणारी याचिका करण्यात आली आहे. मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

कोर्टाने यावेळी पालिकेच्या वकिलांना विचारणा केली की, “केंद्र सरकारने परवानगी दिली तर आम्ही दारोदारी जाऊन लसीकरण करण्यास तयार आहोत असं तुम्ही सांगितलं होतं. एका ज्येष्ठ नेत्याला घरात लस मिळाली असून तेदेखील मुंबईत झालं आहे त्यासंबधी आम्हाला विचारायचं आहे. हे कोणी केल? राज्य की केंद्र सरकार? कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. केरळसारखी इतर राज्यं करत आहेत. मुंबई महापालिका देशासाठी मॉडेल असताना तुम्ही घरोघरी जाऊन लसीकरण करु शकता. केरळने केंद्राच्या परवानगीची वाट पाहिली होती का?”. असे म्हणत हायकोर्टाने लसीकरणाच्या मुद्द्यावरून फटकारले.

तुमची भूमिका सर्जिकल स्ट्राईकची असायला हवी

यावेळी कोर्टाने केंद्राला घऱाजवळ लसीकरण करण्याच्या धोरणासंबंधी विचारणा केली. “कोविड हा मोठा शत्रू आहे आणि आपल्याला त्याला हरवायचं आहे हे तुम्हीदेखील मान्य कराल. शत्रू काही ठराविक लोकांच्या शरिरात असून तो बाहेर येऊ शकत नाही. तुमची भूमिका सर्जिकल स्ट्राइकची असली पाहिजे”.
“सर्जिकल स्ट्राइकची गरज असताना तुम्ही सीमारेषेवर सगळं बळ एकत्र करत आणत आहात मात्र शत्रूच्या प्रदेशात प्रवेश करत नाही. तुम्ही वाट पाहत आहात. तुम्ही लोकांच्या भल्यासाठी निर्णय घेत आहात, पण त्यासाठी फार उशीर झाल्याचं दिसत आहे. जर निर्णय लवकर घेतले असते तर अनेक जीव वाचले असते,” असंही कोर्टाने यावेळी म्हटलं.

पुढील सुनावणीत द्यावे लागणार उत्तर

कोर्टाने यावेळी मुंबई पालिकेच्या वकिलांकडे केंद्राकडे परवानगी मागितली आहे का अशी विचारणा केली. तसंच प्रत्येक राज्यासाठी लागू होईल असं राष्ट्रीय धोरण आहे का अशी विचारणा केंद्राला केली असून जर केरळ, बिहार, जम्मू आणि काश्मीर, ओडिशाने केलं आहे तर मग समस्या काय आहे? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.कोर्टाने केंद्राला पुढील सुनावणीत उत्तर देण्यास सांगितलं आहे. ११ जूनला पुढील सुनावणी होणार आहे.