मुंबई । लॉकडाऊनमधून काहीशी सवलत दिल्यानंतर अचानक रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे निमय मोडून गर्दी केली जात असल्याचे चित्र मुंबईसह अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यावर चिंता व्यक्त करतानाच लोकांनी गर्दी टाळली नाही तर नाईलाजाने पुन्हा एकदा कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा कडक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राज्यात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे. ३० जूनपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलेले आहे. त्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. ही शिथिलता देताना सरकारने काही अटी घातलेल्या आहेत. त्या अर्थातच जनतेच्या हिताच्या आहेत. आपल्याला सर्वांनाच सावध राहून जगावं लागणार आहे, याचे भान सदैव असू द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले
कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही, असे सांगत आपल्याला सर्वांनाच सावध राहून जगावं लागणार आहे, याचे भान सदैव असू द्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केलं. आपल्याला आता कोरोनासोबत जगण्याची सवय लावून घ्यावी लागेल. मी तुमच्याशी मास्क लावून बोलतोय. त्याचं कारण तेच आहे. सुरक्षित अंतर हे आपल्याला राखावंच लागेल. ते राखलं जाईल, हे गृहित धरून लॉकडाऊनमध्ये सवलती देण्यात आल्या आहेत या गोष्टीची आठवण मुख्यमंत्र्यांनी लोकांना खबरदारी बाळगण्याबाबत आवाहन केलं.
वादळाचा धोका टळल्यानंतर या सवलतींची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मैदानांत वा अन्य ठिकाणी वॉक घेण्यास मुभा दिली गेली आहे. मात्र पहिल्याच दिवशी वॉकसाठी झुंबड उडाल्याचे मला दिसले. साहजिकच त्याने धाकधूक वाढली आहे. तुम्हाला व्यायाम करता यावा. वॉक घेता यावा म्हणून तुमच्या आरोग्यासाठी सरकारने सवलत दिली आहे. आरोग्य बिघडवून घेण्यासाठी ही सवलत नाही, हे लक्षात असू द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.
लॉकडाऊनमधून दिलेली उघडीप जीवघेणी ठरणार असेल तर नाईलाजाने पुन्हा एकदा कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. पण मला खात्री आहे, जनता ती वेळ येऊ देणार नाही. राज्यातील जनता सुज्ञ आहे, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले. लोकलसेवा अद्याप सुरू झालेली नाही. बेस्ट सेवा पूर्ण क्षमतेने चालवली जात नाहीय. सरकार स्थितीचा अंदाज घेऊन पावले टाकत आहे. त्यामुळे कुणीही घाई करू नये, गर्दी टाळावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी मर्यादित लोकलसेवा सुरू करण्याची मागणी आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे करत आहोत. केंद्राने याचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in