सातारा | माण आणि खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढत आहे. रुग्णांकडून ऑक्सिजन बेडची मागणी सातत्याने केली जात आहे. शासनाकडून व खासगी संस्थांकडून ऑक्सिजन बेडच्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत. तथापि या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे माण आणि खटावमध्ये ड्रीम सोशल फौंडेशनच्या प्रमुख अनुराधा देशमुख आणि मुकुल माधव फौंडेशनच्या प्रमुख रितू छाब्रिया यांच्या मदतीने व सहकार्याने सुसज्ज असे ऑक्सिजन बेड असलेले कोव्हीड सेंटर उभे करण्यात येत असल्याची माहिती माजी विभागीय आयुक्त व खटाव माण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिली.
प्रभाकर देशमुख म्हणाले, लोकांना सातारा, सांगली, पुणे, बारामती याठिकाणी आम्ही बेड उपलब्ध करून देत आहोत, परंतु तेथेही संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याने बेड अपुरे पडत आहेत. कोरोनाच्या दुसरे लाटेने माण व खटाव मध्ये भीषण स्वरूप धारण केलेले आहे. अनेक लोकांना उपचार करूनही आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये तरुणांनाही मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे. काही जवळचे सहकाऱ्यांना कोरोनाच्या संसर्गामुळे प्रयत्न करूनही आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्या बद्दल खूप दुःख वाटते.
गावागावांत प्रमुख व्यक्तींनी कोरोना संसर्ग तपासणीची मोहीम तीव्र करावी. ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे, त्या गावांमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करावे. औषधोपचार सुरु करून देण्याबाबत ग्रामपंचायतींनी कार्यवाही करावी. आपण सर्वानी या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये लोकांच्या मागे ठामपणे उभे राहून त्यांना मदत करावी. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वानी एकमेकांना सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन प्रभाकर देशमुख यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा