औरंगाबाद – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा येत्या रविवारी २१ मार्च २०२१ रोजी होणार आहे. ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती, पण कोविडच्या पार्श्वभूमीवर ती लांबणीवर टाकण्यात आली. उमेदवारांनी आयोगाच्या या निर्णयाला विरोध केला. हजारो उमेदवार रस्त्यावर उतरले आणि त्यानंतर राज्य सरकारने परीक्षा पुढील आठवडाभरातच घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही परीक्षा येत्या रविवारी राज्यभरात विविध केंद्रांवर आयोजित केली जात आहे.
या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्य लोकसेवा आयोगाने शुक्रवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उमेदवारांना प्रवेश पत्र १४ मार्च पूर्वीच जारी करण्यात आली होती. त्याच प्रवेशपत्रांवर त्यांना २१ मार्च च्या परीक्षेला उपस्थित राहता येणार आहे. परीक्षेची वेळ आणि परीक्षा केंद्र तेच राहणार आहे.
परीक्षा केंद्रात प्रवेश करताना उमेदवारांनी किमान तीन पदरी कापडी मास्क वापरणे अनिवार्य, परीक्षा कक्षात मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझरची लहान पिशवी असलेले किट प्रत्येक उमेदवाराला देण्यात येईल. त्याचा वापर दोन्ही सत्रांकरिता करायचा आहे.
परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता आणि आरोग्यास हितावह वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. कोव्हिड-१९ सदृश्य लक्षणे दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी, कर्मचाºयांना कळवावे, अशा उमेदवारांना मास्क, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शुकव्हर, मेडिकल कॅप आदी गोष्टी असलेलं पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांची स्वतंत्र परीक्षा कक्षात बैठक व्यवस्था करण्यात येईल.
परीक्षा उपकेंद्रावरील योग्य माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तीपत्रिका आदी वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे, परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारीरिक अंतर राखणे अनिवार्य आहे. वापरलेले टिश्यू पेपर, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर पाऊच आदी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कुंडीत टाकावेत. कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुभार्वाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा