नवी दिल्ली । कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढताना दिसत आहे. यामागचे कारण म्हणजे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरुन मागील ४ दिवसांत ९११ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर १ हजार जणांच्या मृत्यूची नोंद होण्यासाठी ४८ दिवस लागले होते. तिथे ही संख्या आता गेल्या ४ दिवसांत नोंदवली गेली आहे.यावरुन भारतात कोरोनाचा फैलाव अद्यापही नियंत्रणात नसल्याचं समोर येत आहे.
जसे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढलं आहे तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजारांवर पोहोचण्यासाठी ८७ दिवस लागले होते. २६ एप्रिलला भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजार होती. पण यामध्ये वेगाने वाढ होत असून फक्त ६ आठवड्यात रुग्णसंख्या २ लाख २६ हजार ७७० वर पोहोचली आहे.
बघायला गेलं तर भारतात १२ मार्च रोजी पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली होती. २९ एप्रिल रोजी भारतात मृतांची संख्या १ हजारावर पोहोचली होती. पण काही आठड्यातच ही संख्या ६०७५ इतकी झाली आहे. ४ जूनपर्यंतची आकडेवारी पाहता फक्त गेल्या चार दिवसांत ९०० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाउनचे नियम शिथील करत असताना समोर येणारी ही आकडेवारी चिंताजनक असून भीती वाढवणारी आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”