राज्यात शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करा : शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. नाशिकमध्ये भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेल्या कोविड सेंटरचा आदर्श घेऊन राज्यात इतर ठिकाणी देखील शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील सहकारी आणि स्वयंसेवी विविध संस्थांना केलं. नाशिकमधील या कोविड सेंटरची प्रेरणा घेतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

नाशिक येथे मेट भुजबळ नॉलेज सिटी व महानगरपालिकेने राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या सहकार्याने विभागीय क्रीडा संकुलात 180 ऑक्सिजन व 115 सीसीसी अशा एकूण 295 बेडची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन स्वरूपात पार पडले. यावेळी पवारांनी हे आवाहन केलं. कोरोनाच्या संकटात रुग्णांच्या मदतीसाठी त्यांना आधार देणारे वैशिष्ट्यपूर्ण व नावीन्यपूर्ण असे ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ नॉलेज सिटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकमध्ये तयार केले आहे. भुजबळांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा असून हे कोविड केअर सेंटर राज्यातील इतर संस्थाना कोरोनाच्या लढाईत काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

स्वयंसेवी संस्थानी आजवर तयार केलेले कोविड सेंटर विलगीकरण व्यवस्था म्हणून तयार करण्यात येत होते. मात्र भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता असलेले नावीन्यपूर्ण कोविड सेंटर उभे राहत आहे. या कोविड केअर सेंटरमधून संकटग्रस्त रुग्णांना मदतीसाठी मोठा आधार मिळेल, असं ते म्हणाले. कोविडचे मोठे संकट देशावर आणि राज्यावर असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्था संघटनाची मदत आवश्यक असून त्यांनी यामध्ये पुढे येण्याची आवश्यकता आहे. नाशिकमध्ये भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेल्या कोविड सेंटरचा आदर्श घेऊन राज्यात इतर ठिकाणी देखील शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करण्यात यावे असे आवाहनही त्यांनी केले.

या सदर कोविड सेंटरमध्ये 180 बेडसाठी ऑक्सिजन लाईनची स्वतंत्र जोडणी केलेली आहे. या ऑक्सिजन लाईनचे मटेरियल सुरत येथून मागवून ही ऑक्सिजन लाईन उभारण्यात आली आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आवश्यक असलेले वेपोरायझर बडोदा, गुजरात येथून आणण्यात आले आहे. ऑक्सिजन व्यवस्थेसाठी लागणारे ड्युरा सिलिंडर वेल्लूर, कर्नाटक येथून आणण्यात आले आहेत तर पुरेशा ऑक्सिजन साठ्यासाठी आवश्यक असलेले 1 केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक पुणे येथून आणण्यात आणले आहे. 180 रुग्णांना सतत पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे.

Leave a Comment