हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण आयपीएल सामने सुरु असून क्रिकेटप्रेमी या सामन्यांचा भरभरून आनंद घेत आहेत. त्यातच ओडिसा मधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. एका क्रिकेट सामन्यात अंपायरने नो बॉल दिला म्हणून संतापलेल्या खेळाडूने वाद घालण्यास सुरुवात केली आणि चाकूने भोसकून अंपायरचा खून केला. खरं तर क्रिकेट हा जेंटलमन खेळ म्हणून ओळखला जातो मात्र या घटनेमुळे य खेळाला मोठा डाग लागला आहे.
रविवारी दुपारी ओडिसा मधील महिशीलंदा गावात शंकरपूर आणि बेरहामपूरच्या 18 वर्षांखालील क्रिकेट संघांमध्ये मैत्रीपूर्ण सामना झाला. लकी राऊत या सामन्यतः पंचाच्या भूमिकेत होते. याचवेळी सामन्यादरम्यान, पंचांनी ‘नो बॉल’चा निर्णय दिला. यावर एका तरुणाने रागाच्या भरात पंचाशी हुज्जत घातली. प्रकरण इतक्या पुढे गेलं कि या खेळाडूने रागाच्या भरात पंच लकी राऊत यांची तेथेच चाकूने वार करून हत्या केली.
अंपायरला गंभीर अवस्थेत एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चौद्वार पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली तसेच आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस सदर आरोपीची कसून चौकशी करत आहेत. मात्र या संपूर्ण घटनेनं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.