बुलडाणा जिल्ह्यात शिवशाही बस-ट्रकचा भीषण अपघात

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवड़ा वरुन पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धड़क दिली. या अपघातात शिवशाही बसचे दोन्ही चालक आणि बसमधील ७ प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर १२ प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी मेहेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरबिड नजिक महामार्गावरील तळेगाव फाट्याजवळ हा अपघात घडला.

रोख रक्कम सोबत कारागृहाऐवजी रमेश कदम आढळला ‘फ्लॅटमध्ये’!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी मागील चार वर्षापासून तुरुंगात असलेला आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार रमेश कदम घोडबंदर रोडवरील एका फ्लॅटमध्ये ठाणे पोलिसांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याच फ्लॅटमध्ये आणखीन एक व्यक्ती होता. धक्कादायक बाब म्हणजे या फ्लॅटमधून लाखो रुपायांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त असतानाही कदम दुसरीकडे गेलाच कसा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

भाजपच्या बंडखोर उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहात पकडले

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या दोन समर्थकांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटताना रंगेहात पकडले आहे. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे शुक्रवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला असून, याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबनराव लोणीकरांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

जालन्यातील परतुरचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील सेवली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वायरल विडिओ मधील भाषणाच्या आधारावर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामगारानेच ५१ लाखांच्या मुद्देमालावर मारला डल्ला

विटा पोलिसांच्या डीबी पथकाने अतिशय मोठ्या चपळाईने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बंद बंगल्याच्या छताचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातून १४५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोलेक्स कंपनीचे १ घड्याळ, स्विसकॉर्न कंपनीची २ घड्याळे रोख ३ लाख असा ५१ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या बिराप्पा बन्ने याला विटा पोलिसानी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ३२ लाखाचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.

ठाण्यात ज्वलनशील केमिकल साठ्यावर छापा, २ केमिकल माफियांना अटक  

भिवंडी तालुक्याच्या पुर्णा येथील केमिकल गोदामावर नारपोली पोलिसांनी छापा टाकला. त्यात पोलिसांनी ८ लाख ३५ हजार ९०० रुपये किंमतीचा केमिकल साठा जप्त केला. तसच केमिकल मालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तिर्थराज पाल आणि विरल गंबीया असे अटक केलेल्या केमिकल माफियांची नाव आहेत.

मिरजेत चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा चाकूने भोसकून खून

मिरज येथील रॉकेल डेपो झोपडपट्टी येथे राहणारी विवाहिता सोनम माने हिचा पती राहुल माने याने चारित्र्याच्या संशयावरून रात्री २ वाजण्याच्या सुमारास पत्नीच्या पोटात चाकूने भोसकून खून केला आहे. खून करून पती राहुल माने हा घटनास्थळावरून फरारी झाला आहे. या खूनाची गांधी चौकी पोलिसात नोंद झाली असून पोलिस आरोपी राहुल माने याचा शोध घेत आहेत.

बलात्कारातून मतिमंद मुलगी गर्भवती, ३ महिन्यांनंतर प्रकार उघडकीस

 एका अज्ञात नराधमाने केलेल्या बलात्कारातून मतिमंद मुलगी गर्भवती झाल्याची घटना जामखेड तालुक्यात उघडकीस आली आहे. पीडितेच्या मतिमंदपणाचा फायदा घेत हा अज्ञात नराधम गेल्या काही महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करत होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘ओमराजेंनी भाजप संपवली म्हणून हल्ला केला!’ हल्लाखोर टेकाळेचा ओमराजेंवर आरोप

कळंब तालुक्यामध्ये भाजपला कमी समजलं जातं. ओमराजे निंबाळकर हे जिल्ह्यातून भाजपा संपवण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्यावरील या रागामुळंच मी ओमराजेंवर हा हल्ला केला असा आरोप ओमराजेंवर हल्ला करणाऱ्या अजिंक्य टेकाळेने केला आहे. सोबतच त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला न्याय द्यावा अशी मागणीही केली आहे.

आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी केली दगडफेक

कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक करत त्यांच्या गाडीचीही तोडफोड केल्याची घटना मध्यरात्री घडली. हा हल्ला शिवसेनेकडून करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.