कराड | शहरात गुरूवारी दिवसभरात विनापरवाना शेळ्या, मेंढ्या, म्हैस व रेडके घेऊन जाणार्या दोन वेगवेगळ्या कारवाईत तीन वाहनांवर कराड शहर पोलिस व वाहतुक शाखेच्या कर्मचार्यांनी कारवाई केली. यामध्ये सुमारे 34 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी चौघांवर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ट्रकचालक संजय चंद्रशेखर (वय 34, रा. गणेश टेंपल रोड, एन. आर. मोहल्ला, म्हैसूर राज्य कर्नाटक) व इम्रान शरिफ (रा. श्रीरंगाट्टना ता. होसहल्ली, जिल्हा मंड्या, राज्य कर्नाटक) व दुसर्या कारवाईत पोपट हणमंत सोडभिसे (वय 51) व अमर अर्जुन काळेल (वय 30, रा. सोमंथळी, ता. फलटण) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा बाजूकडून कर्नाटक राज्याकडे वाहतुक परवाना नसताना जास्त प्रमाणात शेळ्या व मेंढ्या ट्रकमध्ये भरून क्रुरतेची वागणूक देऊन त्यांची ट्रकमध्ये चारा व पाण्याची व्यवस्था न करता वाहतुक करणार्या ट्रकला पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सागर हॉटेलसमोर कराड शहर पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता ट्रकमध्ये सुमारे 17 लाख रूपये किमतीच्या 340 शेळ्या व मेंढ्या आढळून आल्या. यामधील 3 शेळ्या मयत झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 17 लाख रूपये किमतीच्या शेळ्या, मेंढ्या व 7 लाख रूपये किमतीचा ट्रक असा सुमारे एकूण 24 लाख रूपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खिलारे करीत आहेत.
तर दुसर्या कारवाईत शहर वाहतूक शाखेतील हवालदार सुनील पाटील तसेच महिला पोलीस नाईक सोनम पाटील हे दोघेजण शहरातील कृष्णा कॅनॉलवर वाहतूक नियंत्रण करीत असताना त्यांनी दोन टेम्पो अडविले. त्यावेळी वोर्लेन्टियर ध्यान फाऊंडेशनचे प्रतीक अप्पासाहेब ननावरे त्याठिकाणी आले. संबंधित टेम्पोमधून जनावरांची बेकायदा वाहतूक केली जात असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगीतले. त्यामुळे पोलिसांनी टेम्पोच्या हौद्याची तपासणी केली असता हौद्यात दाटीवाटीने म्हैशी भरल्याचे दिसून आले.
पोलिसांनी दोन्ही टेम्पो कराड शहर पोलीस ठाण्यात नेऊन चालकांकडे परवान्याची मागणी केली. त्यावेळी दोघांकडेही परवाना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जनावरांची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांच्याकडून 29 म्हैशी, 11 रेडके आणि दोन टेम्पो असा 9 लाख 56 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मध्यस्थीसाठी पोलीस ठाण्यात गर्दी
पोलिसांनी बेकायदा जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पकडल्यानंतर तो शहर पोलीस ठाण्यात आणला. संबंधित शेळ्या व मेंढ्या एका मोठ्या व्यापार्याच्या असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या व्यापार्याच्या सांगण्यानुसार अनेकजण दुपारपासून पोलीस ठाण्यात मध्यस्थीसाठी ठाण मांडून बसले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना न जुमानता गुन्हा दाखल करुन शेळ्या, मेंढ्या ताब्यात घेतल्या.