औरंगाबाद – जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटीलेटर लावण्यात आले होते, त्यांची ‘केस स्टडी’ करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करावी. तसेच ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करा, ज्या भागात लसीकरण कमी आहे, तेथील डॉक्टरावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी आढावा बैठकीत सांगितले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक सोमवारी पार पडली. ज्या भागात लसीकरण कमी आहे त्या भागातील डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे देखील दाखल करण्यात येतील. ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हिल’ अंतर्गत ज्या भागात लसीकरण कमी आहे त्या भागात वाहने नेण्यात यावे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर लावण्यात आले होते अशा रुग्णांची ‘केस स्टडी’ करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात यावी.
हा गट अशा रुग्णांपैकी किती रुग्णांनी पहिला, दुसरा डोस घेतला होता तसेच किती रुग्णांनी एकही डोस घेतला नाही अशा रुग्णांचा अभ्यास करेल असेही जिल्हाधिकारी म्हणाले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, अप्पासाहेब शिंदे, पोलिस उपायुक्त उज्वला बनकर, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. सुधाकर शेळके उपस्थित होते.