औरंगाबाद – केंद्रीय लघु व सूक्ष्मउद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे मंगळवारी (ता. २४) क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले होते. आंदोलन करणाऱ्या शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात कोरोना नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणात पोलीस अंमलदार सोपान छगनराव मोहिते (५२) यांच्या फिर्यादीनुसार २४ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कार्यकर्ते निदर्शने करण्यासाठी जमलेले होते. दरम्यान कोरोना नियमावलीचा भंग करत आंदोलन करण्यात आले.
याप्रकरणी आमदार अंबादास दानवे, राजेंद्र जंजाळ, ऋषीकेश खैरे, मिथून व्यास, हनुमान शेख, शेखर जाधव, निलेश उबाळे, ज्योतीराम पाटील, नवल अग्रवाल, शेखर पेरकर यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांविरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.