हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यावेळी “फडणवीस हे कार्यक्षम नेते आहेत, त्यांनी केंद्रात काम करावं आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष देतील” असा सल्ला शिरसाट यांनी फडणवीसांना दिला होता. आता याच वक्तव्याचा आधार घेत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका करण्यात आली आहे. त्याचबरोबर, “कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून फडणवीसांची लायकी काढली” असे देखील सामनाच्या अग्रलेखातून म्हटले गेले आहे.
सामनामधून टीका
आज प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या अग्रलेखात फडणवीसांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तर, कपॅसिटी असताना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून खाली आणले आणि कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून ‘लायकी’ काढली हे बरे नाही. फडणवीसांची गरज दिल्लीत आहे, असे शिंदे गट म्हणतोय. मणिपूरपासून कश्मीरपर्यंत बरेच प्रश्न आहेत, चिनी सैन्यही देशाच्या सीमा भागांत घुसले आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्याची फडणवीसांची कपॅसिटी आहेच. मोदी-शहा पूर्ण अपयशी ठरले आहेत. फक्त फडणवीसांना दिल्लीत पाठविण्याची कपॅसिटी शिंदे-मिंधे गटात आहे काय? असा सवाल सामना तून विचारला गेला आहे.
फडणवीसांची लायकीच निघाली..
पुढे शिवसेनेने संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन फडणवीस यांना चांगलेच सुनावले आहे. “शिंदे गटाचे प्रवक्ते शिरसाट यांनी सांगितले की, ‘‘फडणवीस यांचे काम उत्कृष्ट आहे, त्यांनी केंद्रात जावे.’’ फडणवीसांवर ही काय वेळ आली आहे? महाराष्ट्रातील यत्किंचित लोक त्यांना केंद्रात जाऊन काम करण्याचा सल्ला देत आहेत. फडणवीसांची लायकीच या प्रकरणात निघाली. शिंदे हे अलीकडे वारंवार रात्री-अपरात्री दिल्लीत जातात ते फडणवीस यांना केंद्रात स्थान मिळावे यासाठीच की काय? फडणवीस हे अपमानाचा घोट गिळून महाराष्ट्रात दुय्यम स्थानी बसले आहेत” अशी टोलेबाजी शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात केली आहे.
शिरसाट यांनी काय म्हटले होते?
संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हटले होते की, “मुख्यमंत्रीपदाबाबत काही लोक बॅनर लावतात, परंतु, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीसांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. हे बॅनर लावण्यात काही गैर नाही. परंतु, माझी इच्छा आहे की, एकनाथ शिंदे यांनीच महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि देवेंद्र फडणवीस इतकं चांगलं काम करत आहेत, त्यांची इतकी क्षमता आहे की त्यांनी केंद्रात नेतृत्व करावं”