हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. येत्या १ मे पासून 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना देखील लसीकरण केले जाणार आहे. मात्र मुंबईमध्ये लसीकरणासाठी तोबा गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. मागील अनेक दिवसांपासून ठप्प असलेल्या लसीकरण केंद्रावर लसी उपलब्ध झाल्याचे समजताच मुंबईकरांनी लसीकरण करून घेण्यासाठी गर्दी केली. बारा वाजल्यापासून लसीकरण सुरू होणार असं असलं तरी नागरिकांनी मात्र सकाळपासूनच रांगा लावलेल्या होत्या.
लसीकरणासाठी मर्यादित म्हणजे 4200 लसीचे डोस उपलब्ध झाले असून कोव्हॅक्सिनचे केवळ 1000 डोस शिल्लक असताना असताना नागरिक मात्र हजारोंच्या संख्येने होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा एकच वेळी गोंधळ उडाला.महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांना सांभाळता सांभाळता नाकी नऊ आले.बुधवारी रात्री मुबलक साठा उपलब्ध झाल्यानंतर आज आपल्याला लसीकरण करता येईल या उद्देशाने नागरिक वेगवेगळ्या केंद्रांवर गेले होते. खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध नसल्यामुळे अखेर महापालिकेच्या केंद्रांवर नागरिकांना यावे लागले. मात्र इथे सुद्धा मोजकाच साठा उपलब्ध असल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला.
मुंबईच्या बीकेसी केंद्रांवर पाच हजार तर गोरेगाव केंद्रावर 4200 डोस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि या केंद्रावर यापेक्षा दुप्पट गर्दी दिसून आली, गेले काही दिवस महापालिकेत येणारा साठा कमी जास्त प्रमाणात आहे त्यामुळे असलेल्या साठ्याचे व्यवस्थित नियोजन करणे महत्त्वाचे आहे.