औरंगाबाद : चालकांचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला. व त्यामधील इंधनाची गळती सुरू झाली. ही बाब गावकऱ्यांना कळताच वाहणाऱ्या डिझेल घेण्यासाठी नागरिकांनी धोकादायक पद्धतीने गर्दी केली. ही घटना आज सकाळी मुंबई- औरंगाबाद महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील करंजगाव या ठिकाणी घडली. या अपघातात चालक जखमी झाला. संदीप कुमार सरोज असे जखमी चालकांचे नाव आहे.
या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, (एम.एच.01 सि.व्ही.9876) या क्रमांकाचा टँकर मुंबईहून 20 हजार लिटर डिझेल घेऊन मेहकरला चालला होता. दरम्यान औरंगाबाद- मुंबई महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील करंजगाव या ठिकाणी चालकाचा स्टेअरिंग वरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाला. अपघातानंतर टँकर मधून मोठ्या प्रमाणात डिझेल गळती सुरू झाली. ही माहिती काही वेळातच वाऱ्यासारखी परिसरातील गावात पोहोचली. आणि नागरिकांनी वाहणारे डिझेल घेण्यासाठी तुंबळ गर्दी केली. सुमारे दीड ते दोन तास हा प्रकार सुरू होता. दुचाकी, चारचाकी, रिक्षा, लोडिंग वाहनातून गावकऱ्यांनी बँकेत, हंडे, ड्रम मिळेल त्या साहित्यात हा डिझेल घेऊन गेले.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत नागरिकांना पांगविले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने जखमी चालकाला रुग्णालयात हलविले. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
अपघाती टँकर मधून डिझेल घेण्यासाठी गावकऱ्यांची तोबा गर्दी; करंजगावतील घटना. pic.twitter.com/ZYfmQs5yJV
— Hello Maharastra Aurangabad (@AurangabadHello) June 19, 2021