मुंबई | विधानभवनात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी शिंदे गट आणि विरोधक चक्क पायऱ्यावर घोषणाबाजीवरून शिवीगाळ करण्यापर्यंत गेले. अजून काही वेळ हा प्रकार सुरू राहिला असता तर मुद्दे बाजूला सारून गुद्यावर आमदार गेले असते. या सर्व प्रकारात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदार संघातील शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि आ. अमोल मिटकरी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. यावेळी आ. महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार आ. मिटकरी यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या चाैथ्या दिवशी आज सत्ताधारी शिंदे गट आणि विरोधक आमनेसामने आले. विरोधी आमदार 50 खोके एकदम अोके यासह अन्य घोषणा देत होते. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी पायऱ्यावर थांबून विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा विरोधी पक्षनेते अजित पवार, रोहित पवार यांनी राष्ट्रवादी आणि विरोधी आमदारांना तेथून बाजूला केले. यावेळी आ. मिटकरी आणि आ. महेश शिंदे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. प्रामुख्याने राष्ट्रवादीचे आमदार आणि शिंदे गटाचे आमदार यांच्यात शब्दिक फेकही झाली.
गेल्या तीन दिवसापासून अधिवेशनात शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांना विरोधकांकडून डिवचले जात होते. बंडखोर आमदार विधान भवनात जात असताना, 50 खोके एकदम अोके यासह अनेक घोषणा दिल्या जात होत्या. अशातच बंडखोर शिंदे गटाकडून आज सकाळी विधान भवनाच्या पायऱ्यावर विरोधकांच्या विरोधात घोषणा सुरू केली अन् हा सर्व राडा सुरू झाला.