नवी दिल्ली । केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीच्या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करत आहे. याचाच परिणाम म्हणजे 13 नोव्हेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. आता आज संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीची या मुद्द्यावर पुन्हा बैठक होत आहे. पहिल्यांदाच, नियामक आणि धोरण-निर्माते तसेच क्रिप्टो मार्केटमधील भागधारक या बैठकीत सहभागी होतील.
आजच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते
केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. संसदेच्या पुढील हिवाळी अधिवेशनात ते मांडले जाऊ शकते. रिपोर्ट्स नुसार, संसदीय समिती क्रिप्टो इंडस्ट्रीच्या सर्व पैलूंचा आज बंद दरवाजांच्या आत विचार केल्यानंतर महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकते. 13 नोव्हेंबरच्या बैठकीत क्रिप्टोकरन्सीबाबत खोटी आश्वासने आणि गैर-पारदर्शक जाहिरातीद्वारे तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न थांबविण्यावर भर देण्यात आला होता. आज, क्रिप्टो फायनान्सवरील संसदीय समितीच्या बैठकीत, या वेगाने वाढणाऱ्या इंडस्ट्रीतील आव्हाने आणि संधी यावर चर्चा केली जाईल.
आजच्या बैठकीला कोणकोण उपस्थित राहू शकतील
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, सरकार क्रिप्टोकरन्सीबद्दल तज्ञ आणि भागधारकांशी चर्चा करत राहील असा निर्णय घेण्यात आला. फ्लोटिंग क्रिप्टो मार्केटला मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगचे शस्त्र बनू दिले जाणार नाही यावरही बैठकीत चर्चा झाली. क्रिप्टो एक्सचेंज ब्लॉकचेन आणि क्रिप्टो अॅसेट्स कौन्सिलचे सदस्य आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकतील.
RBI ने क्रिप्टोकरन्सीला मोठा धोका असल्याचे सांगितले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की,”व्हर्चुअल करन्सीबाबत केंद्रीय बँकेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. आम्ही क्रिप्टोकरन्सीबाबत आमच्या चिंता सरकारला कळवल्या आहेत.” ते पुढे म्हणाले की,”गुंतवणूकदारांनीही डिजिटल करन्सीबाबत अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. हा मोठा धोका ठरू शकतो. हे कोणत्याही वित्तीय व्यवस्थेसाठी गंभीर धोका आहेत, कारण ते केंद्रीय बँकांच्या नियंत्रणाखाली नाहीत.”