अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या मनी लॉंद्रीप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून आज त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.अनिल देशमुख यांचे वकील आज न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार असून या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांना याआधी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द करत देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलं. दरम्यान, आज त्यांची कोठडी संपणार होती. त्यामुळे ईडीने त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

काय आहे प्रकरण-

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.

ईडीने पाच वेळा समन्स बजावूनदेखील अनिल देशमुख आले नव्हते. अनिल देशमुख यांच्याकडून कायदेशीर मार्ग अवलंबण्यात येत होते. त्या दरम्यान ते अज्ञातवासात होते. अखेर काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर 13 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली होती.