व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. आज दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान हा अपघात झाला. मुंबई – अहमदाबाद महामार्गावर पालघर चारोटी परिसरात झालेल्या या भीषण अपघातात सायरस मिस्त्री यांच निधन झालं. तसेच या अपघातात त्यांचा ड्राईव्हर गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

पालघर जिल्हा अधीक्षकांनी याबाबत माहिती दिली आहे. सायरस मिस्त्री हे आज दुपारी अहमदाबातवरुन मुंबईला येत होते. मर्सिडिस मधून ते प्रवास करत होते यावेळी डिव्हायडरला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

कोण आहेत सायरस मिस्त्री?

सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईत पारसी कुटुंबात झाला. प्रसिद्ध उद्योगपती पल्लोनजी शापूरजी यांचे धाकटे पुत्र होते. त्यांचे शिक्षण लंडन बिझनेस स्कूलमध्ये झाले. लंडनच्या इंपीरियल कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. सायरस मिस्त्री 2006 साली टाटा समुहाचे सदस्य बनले होते. तर 2013 ला वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी टाटा समुहाचे अध्यक्ष बनले होते. मात्र, 2016 साली त्यांना टाटाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते.