हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या दर्शना पवार हिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ती ज्या मित्रासोबत राजगडावर गेली होती तो सुद्धा बेपत्ता झाल्यामुळे दर्शनाचा मृत्यू घातपात तर नाही ना? अशी शंका यापूर्वीच पोलिसाना आली होती. याच पार्शवभूमीवर तिच्या मृतदेहाचे पोस्ट मॉर्टम करण्यात आले असून या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रविवारी दर्शना पवार हिचा मृतदेह सापडल्यानंतर त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. यावेळी तिच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर येत आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट येताच पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ज्या मित्रासोबत ती राजगडावर गेली त्या राहुल दत्तात्रय हांडोरे याच्याभोवतीच संशयाशी सुई आहे. राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला असून तो गेल्या काही दिवसापासून फरार आहे. पोलीस राहुलचा कसून शोध घेत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण –
मूळची अहमदनगरची असलेली दर्शना पवार ही पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. तिने यंदाच्या एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरं क्रमांक पटकावला. वन अधिकाऱ्याची पोस्ट तिला मिळाली होती. यानंतर ९ जून रोजी पुण्यातील सत्काराच्या कार्यक्रमासाठी ती स्पॉट लाईट ॲकॅडमी येथे आली होती. ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत घरच्या मंडळीच्या संपर्कात होती. मात्र १२ जूननंतर तिचा काहीच संपर्क न झाल्याने तिच्या पालकांनी स्पॉट लाईट ॲकॅडमी येथे येऊन विचारपूस केली. त्यावेळी १२ जूनला दर्शना आणि तिचा मित्र राहुल हे ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर गेल्याचे सांगण्यात आलं. मात्र, यानंतर दोघेही संपर्कात नाहीत आणि माघारी देखील आलेले नाहीत. यामुळे दर्शनाच्या पालकांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दिली. या तक्रारीनंतर दर्शनाचा शोध घेतला असता राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.