औरंगाबाद : एकीकडे हुंडा बंदी असताना हुंडा घेणे कायद्याने गुन्हा आहे हे माहिती असताना देखील २ लाख हुंडा घेऊनही ५० हजाराच्या गाडीसाठी चक्क लग्न मोडल्याचा मुकुंदवाडी येथे प्रकार समोर आला आहे.
हुंडा म्हणून दोन लाख रूपये घेतले. त्यानंतर साखरपुडा केला आणि ऐनवेळी ५० हजार मागितले. पैसे न दिल्याने गाडीसाठी नवरदेवा कडील मंडळींनी लग्न मोडले. या प्रकरणी नियोजित वधूने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल छगन राठोड (नवरदेव), छगन भीमा राठोड (वडील) आणि आई मध्यस्थी करणारे रमेश राठोड, सुनील राठोड अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी कविता छगन चव्हाण (२१, रा. अंबिका नगर, गल्ली क्रमांक ५ मुकुंदवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कविताचे अनिल राठोड यांच्यासोबत लग्न ठरले. तिच्या आई-वडिलांना विश्वासात घेऊन अनिलच्या कुटुंबीयांनी दोन लाख रुपये हुंडा घेतला. त्यानंतर अचानक गाडी घेण्यासाठी 50 हजार रुपये मागितले ते पैसे घेऊन आणखी पैशाची मागणी केली. वधूच्या आई-वडिलांचा जवळपास चार लाख रुपये खर्च केला. त्यानंतर अचानक लग्नाला नकार दिला. त्यामुळे अखेर कविताने मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली. या प्रकरणाचा अधिक तपास मुकुंदवाडी पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी दिली.