सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा बँकाच्या निवडणुका झाल्यानंतर अध्यक्षपद राखण्यासाठी विविध जिल्ह्यांत महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र आलेले दिसत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात वेगळीच चर्चा सुरू आहे. सातारा जिल्हा बँकेचं अध्यक्षपद भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना देण्याच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सुरू असल्याचं समजतं. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीत जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाबाबत चर्चा झाल्याचं समजतं. तसंच,अध्यक्षपद मिळावं अशी इच्छा बोलून दाखविल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. शरद पवार यांच्या भेटीच्या वेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेगवेगळ्या विषयांबाबत सुद्धा चर्चा झाल्याचेही बोललं जातं. रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवार यांच्या सोबत बोलणं झालं का, या पवारांच्या प्रश्नावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं. पालकमंत्र्यांशीही बोलणं झालं आहे, असं शिवेंद्रराजेंनी पवारांना सांगितलं.
त्यावर, ‘अजित आणि रामराजे यांच्या सोबत बोलून घेतो, असं शरद पवार यांनी शिवेंद्रराजेंना सांगितलं आहे. सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, शिवेंद्रराजेंनी जबरदस्त फिल्डींग लावल्याचं चित्र आहे. आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडं जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे.