हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कराड तालुक्यातील वनवासमाची येथे डोंगरात एका 45 वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात होता. मात्र, तपासातील संशयित 65 वर्षीय वृद्धाचा कराड येथील बेलवडे हवेली गावच्या हद्दीत मळी नावाच्या शिवारात कृष्णा नदीपात्रात मृतदेह आढळून आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कृष्णा नदीपात्रात आढळून आलेले मयत इसमाचे नाव नामदेव तुकाराम सुतार (वय- 65) असून त्यांची मंगळवार (दि. 14) व बुधवार (दि. 15) रोजी खुना संदर्भात चौकशी केली होती. मात्र, गुरुवार (दि. 16) पासून ते घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. दि. 17 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कराड तालुक्यातील बेलवडे हवेली येथील मळी नावाच्या शिवारात कृष्णा नदी पात्राकडेला त्यांचा पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना मिळून आला.
महिलेच्या खून प्रकरणी त्यांची तळबीड पोलिसांनी चौकशी केली होती. संबंधित संशयित व्यक्तीचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याची माहिती तळबीड पोलिसांनी दिली असून संबंधित संशयित वृद्ध व्यक्तीचा मृत्यू हा बुडून झाला कि आत्महत्या यामुळे या प्रकरणातील गूढ आता वाढले आहे.
शुक्रवारी रात्री संशयितांचा मृतदेह नदीपात्राच्या कडेला आढळून आल्यानंतर याबाबतची फिर्याद पोलीस पाटील, अक्षय तानाजी पाटील यांनी तळबीड पोलिसात दिली. त्यानंतर सदर मयत इसमाची चौकशी केली असता वनवासमाची गावच्या हद्दीतील डोंगरात 45 वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी चौकशीत संशयित असल्याचे उघड झाले आहे. संबधित प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांच्याकडून केला जात आहे.