हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यावर्षी दिवाळी सणानिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांना एक गिफ्ट मिळणार आहे. कारण, नुकतीच रेल्वे विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्याची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाने 23 ऑक्टोबर रोजी याविषयीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, आता रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागात भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के झाला आहे. हा नवीन भत्ता 1 जुलै 2023 पासून लागू होणार आहे.
रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, दिवाळी सणाच्या निमित्ताने रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात आला आहे. त्याचबरोबर, कर्मचाऱ्यांना जुलै 2023 पासून ते आतापर्यंतची थकबाकी दिली जाणार आहे. ही थकबाकी पुढील महिन्याच्या पगारात देखील जमा होणार आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदात आणखीन भर पडणार आहे. खरे तर, गेल्या जुलै 2023 पासून कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्यात होणारी वाढ प्रलंबित होती. मात्र आता हा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.
या संदर्भात पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे स्वागत कर्मचारी संघटनांकडून करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्य म्हणजे, रेल्वे बोर्डाच्या या निर्णयापूर्वी केंद्र सरकारने देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. केंद्र सरकारकडून या बोनसची कमाल 7,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी मंत्रिमंडळाने तब्बल 15000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखीन गोड होणार आहे.