कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी काढण्यात आलेल्या मोर्चातील अनेक कर्मचाऱ्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. यामध्ये सहभागी झालेल्या कराड आगारातील महिला वाहक सुषमा नारकर (वय- 41, रा. येवती, ता. कराड, जि. सातारा) यांचे निधन झाले आहे. सिल्व्हर ओकवरील आंदोलनानंतर त्यांना अटक झाली होती. त्यानंतर त्या आठ दिवस त्या तुरुंगात होत्या.
एसटी कर्मचारी यांच्या आंदोलनात सुषमा नारकर यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. त्यानंतर सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या मोर्चातही सहभाग घेतल्याने त्यांना अटकही झाली. दरम्यान, जामिनावर सुटका झाल्यापासून त्या आजारी होत्या. त्यातच प्रकृती खालावल्याने बुधवारी त्यांचे निधन झालं.
महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या कराड आगारातील सुषमा नारकर या पहिल्या महिला वाहक होत्या. सन 2000 मध्ये कराड एसटी आगारात वाहक म्हणून दाखल झाल्या होत्या. त्यानंतर सुमारे 22 वर्षे त्यांनी वाहक म्हणून एसटीमध्ये सेवा दिली होती. त्याच्या पश्चात आई- वडिल, भाऊ व एक बारा वर्षाचा मुलगा आहे.