औरंगाबाद । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व त्यांच्या समर्थकांनी लाॅकडाऊनला स्थगिती मिळाल्याचे श्रेय घेत जल्लोष साजरा केला. संचारबंदी असताना मिरवणूकही काढली, कोरोनाचे सगळे नियम धाब्यावर बसवले असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केला आहे. इम्तियाज जलील यांच्यावर सायंकाळी सात वाजेपर्यंत गुन्हा दाखल करा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा देखील भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील लाॅकडाऊन स्थगित करण्याचा निर्णय काल जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला. लाॅकडाऊनच्या विरोधात एमआयएमने मोर्चा काढण्याची घोषणा केल्यामुळेच सरकारने लाॅकडाऊनचा निर्णय मागे घेतला, असा दावा करत खासदार इम्तियाज जलील यांची त्यांच्या समर्थकांनी रात्री मिरवणूक काढत घोषणाबाजी व जल्लोष करत कोरोनाचे नियम पायदळी तुडवले. सर्वसामान्यांनी मास्क घातला नाही तर दंड केला जातो, त्याच्यावर कारवाई केली जाते. मग खासदार इम्तियाज जलील व त्यांच्या समर्थकांसाठी वेगळे नियम आहेत का? असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.
शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी या संदर्भात सिटीचौक पोलीस स्टेशनमध्ये इम्तियाज जलील व त्यांच्या समर्थकांविरुद्ध तक्रार दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. लाॅकडाऊन जनतेच्या हिताचा नाही अशी भूमिका घेत भाजपने जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना घेराव घालून त्यांना वस्तुस्थिती सांगितली होती. भाजपच्य विरोधामुळेच लाॅकडाऊनला स्थगिती मिळाल्याचा दावा देखील केणेकर यांनी केला. सरकार आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यात मिलीभगत आहे का ? असा सवाल देखील केणेकर यांनी उपस्थित केला. सायंकाळपर्यंत इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला नाही , तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील केणेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.