औरंगाबादमध्ये शंभर टक्के लाॅकडाऊन लावायचा की नाही; आज होणार निर्णय

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. रोज एक हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तर चार-पाच दिवसांत बळींचा आकडाही शंभरापर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात पुन्हा शंभर टक्के लॉकडाऊन लावण्यावर प्रशासन विचारविनिमय करत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त, मनपा प्रशासक व जिल्हाधिकारी यांच्यात बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तासभर बैठक झाली. यात लॉकडाऊन लावायचा की निर्बंध आणखी कडक करायचे, याबाबत चर्चा झाली. आज पालकमंत्री सुभाष देसाई शहरात येत असून त्यांच्याशी चर्चा करूनच लॉकडाऊनबाबात अंतिम निर्णय घेण्याबाबत तिन्ही अधिकाऱ्यांचे मतैक्य झाल्याची माहिती आहे. शहरात सध्या रात्री आठ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू आहे. तसेच शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात येत आहे. तरीही कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आणखी कठोर उपाययोजना करण्याबाबत विचार केला जात आहे.

लोकप्रतिनिधींशी करणार चर्चा खासदार इम्तियाज जलील यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींचा शहरात पुन्हा लॉकडाऊन लावण्यास विरोध आहे. मात्र, १० मार्चपासून अंशत: लाॅकडाऊनचा निर्णय घेताना जिल्हाधिकारी, मनपा प्रशासकांनी एकाही लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. आता पालकमंत्र्यांप्रमाणे स्थानिक आमदार, खासदारांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like