औरंगाबाद | कोरोनाला हरवण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरु झाल्यावर प्रचंड प्रमाणात लसीकरणासाठी नागरिक येत होते. परंतु लसींचा साठा कमी मिळत असल्यामुळे अधून मधून लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. आता पर्यंत 18 वर्षांवरील 7 लाख 35 हजार नागरिकांनाच पहिला डोस मिळाला आहे.
केंद्र सरकारकडून औरंगाबाद शहराला तब्बल 25 हजार डोस मिळत होते. परंतु आता लसीची मागणी वाढत असतानाच केंद्र सरकारने आणखी एक धक्का दिला आहे. औरंगाबादला आता फक्त 5 हजार लस मिळणार आहे.आता केंद्राकडून लसींचा पुरवठा अत्यंत कमी होत असल्यामुळे आता लसीकरण कधी आणि कसे होणार याकडे लक्ष लागलेले आहे.
16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. आणि 12 जुलैपर्यंत पहिला डोस 7,35,019 तर 13 जुलैपर्यंत 2,13,731 दुसरा डोस देण्यात आला होता. 18 वर्षांवरील नागरिकांची म्हणजे लसीकरणाच्या लाभार्थ्यांची संख्या ही 32 लाख 87 हजार आहे. जानेवारी महिन्यात हेल्थलाइन वर्कर, फ्रंटलाइन वर्कर, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील विविध आजार असलेल्या नागरिकांना लस देण्यात आली होती. शहरालगत असलेल्या खासगी व्यवस्थापकांनी, कंपनींनी आमच्या कर्मचाऱ्यांना लसी द्या असा मनपाकडे आग्रह धरला आहे. परंतु मनपाने अजूनही एकाही संस्थेचा अर्ज मंजूर केलेला नाही. त्याचबरोबर खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना लस कशी देणार, असा प्रश्न आरोग्य विभागाने विचारला आहे.




