औरंगाबाद : मालमत्ता कर वसुलीत गतवर्षीच्या तुलनेत महापालिकेला आतापर्यंत साडेसोळा कोटींची घट झाली आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत फक्त वीस टक्के वसुली झाली असल्यामुळे त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वसुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे महपालिका तोट्यात आहे.
मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. गतवर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे करवसुलीवर परिणाम झाला. मार्चमध्ये सर्वांत जास्त करवसुली होत असते आणि गतवर्षी मार्चमध्येच कोरोना संसर्गाची लागण सुरु झाल्यामुळे त्याचा वसुलीवर परिणाम झाला आणि सुमारे वीस कोटी रुपयांची करवसुली कमी झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यामुळे यंदा दिवाळीपर्यंत पालिकेने करवसुलीकडे लक्ष दिले नाही. दिवाळीनंतर त्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. कर निर्धारक व संकलक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०२० ते २५ मार्च २०२१ पर्यंत मालमत्ता कराची वसुली ९६ कोटी ८३ लाख ३७ हजार ५२८ रुपये झाली आहे. गतवर्षी याच काळात मालमत्ता कराची वसुली ११३ कोटी ४९ लाख ६१४ रुपये झाली होती.
गतवर्षीच्या तुलनेत यंदाची करवसुली १६ कोटी ६५ लाख ६३ हजार ८६ रुपयांनी कमी आहे. हे प्रमाण २०.६६ टक्के इतके आहे. यंदा १ एप्रिल २०२० ते २५ मार्च २०२१ दरम्यान पाणीपट्टीची वसुली २७ कोटी ३४ लाख ३४ हजार २९५ रुपये इतकी झाली आहे. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीची एकत्रित आकडेवारी १२४ कोटी १७ लाख ७१ हजार ८२३ रुपये इतकी आहे.
मालमत्ता करवसुलीचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत घटलेले असल्यामुळे त्याचा पालिकेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल, असे मानले जात आहे. विकास कामांवरही परिणाम होऊ शकतो असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मार्चअखेर लक्षात घेता मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त करवसुली होईल अशी महापालिकेला अपेक्षा आहे. त्यासाठी आता सुट्टीच्या दिवशीही सर्व क्षेत्रीय कार्यालयातील लेखा विभाग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार, रविवार व अन्य सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत करवसुलीसाठी पालिकेची कार्यालये सुरू राहतील.
बजेटला मुहूर्त लागेना
मार्च संपत आला तरी, महापालिकेच्या बजेटला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. लवकरच बजेट सादर केले जाईल, असे पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी म्हटले आहे. दरवर्षी पदाधिकारी व नगरसेवकांमधील रस्सीखेचीमुळे बजेट लांबणीवर पडते. यंदा पालिकेत प्रशासकीय राजवट असल्यामुळे ते लवकर सादर होईल असे मानले जात होते, पण अद्याप ते सादर झाले नाही.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा