हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीला धक्का देत सत्तेवर आलेल्या शिंदे गट व भाजपकडून एकमेकांच्या हातात हात घालून काम चांगल्या प्रकारे केले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडूनही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेतला जाणार होता. ते महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. आणि भाजपाबरोबर पुन्हा युती होणार होती. स्वत: उद्धव ठाकरे भाजपाशी हातमिळवणी करण्यासाठी प्रयत्न करत होते, पण तसे झाले नाही, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
दीपक केसरकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची भाजपाबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती होती. या युतीपासून दूर जाणे उद्धव ठाकरेंना पटले नव्हते. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदीही भेट देत नव्हते. तरीही भेट घडवून आणली. उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांशी बोलणी झाली. उद्धव ठाकरेंनी कबूल केले की, घडलेले चुकीचे आहे. हे सुधारले गेले पाहिजे, असे म्हणत भाजपाबरोबर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंनी वचन दिले होते. किरकोळ मतभेद झाले असतील, तर ते मिटले गेले पाहिजेत, हे सुद्धा त्यांना पटत होते.
काही वेळ व्यक्तीगत आणि कुटुंबावरील आरोपांमुळे निश्चित दुखावले जाऊ शकतात. पण, दुखावलं गेल्यामुळे एवढा मोठा निर्णय, जो आपल्या पक्षाच्या, विचारांच्या विरोधात आहे. हे कितपत योग्य आहे, हे त्यांना सुद्धा पटलेले असावे म्हणून त्यांनी याला मान्यता दिली होती. मात्र, ते घडले नाही. हे का घडले नाही, हे आमदारांना समजून का सांगितले नाही,” असा सवाल केसरकरांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.