हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले आहेत. त्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात असताना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी शिंदे-ठाकरे गट एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे. “आपल्यात नेमकं काय घडलं याचं आत्मपरिक्षण मी केलं पाहिजे तसं त्यावेळच्या आमच्या पक्षप्रमुखांनी देखील केलं पाहिजे. आणि तसं झालं तर मग शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही,” असे केसरकर यांनी म्हंटल आहे.
दीपक केसरकर यांनी आज शिर्डीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे-ठाकरे गटाच्या एकत्रित येण्याबाबत त्यांनी भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, मी फक्त एवढंच म्हटलं की, साहेब मला आपल्याबद्दल आदर आहे. तो आदर मी पक्ष सोडताना देखील दाखवला होता. मी त्यांना सांगितलं होतं की, ज्यावेळेस घर पेटतं त्यावेळेस आग अगोदर विझवायला लागते. कशामुळे लागली हे नंतर बघुया. आधी आपलं घर सुरक्षित ठेवूयात. ऐकलं नाही. ते मोठे आहेत. मी छोटासा मनुष्य आहे.
पैशांसाठी मनुष्य विकला जात नाही. त्याचं मन जिंकायला लागतं. ते मन एकनाथ शिंदे यांनी जिंकलंय. म्हणून आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. काय-काय झालं ती प्रत्येक गोष्ट सांगेन. नवीन वर्ष आहे म्हणून उत्तर दिलं नाही. कटुता कमी करणं हे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. मी काल ज्यावेळेला त्यांना भेटलो तेव्हा ते भावनाविवश झालेले होते. ते काय बोलले, मी त्यांना मानणारा, त्यांच्याबद्दल आदर ठेवणारा मनुष्य आहे. त्यामुळे मी त्यांना काहीच उत्तर दिलेलं नव्हतं, असे केसरकर यांनी सांगितले.