Sunday, May 28, 2023

दीपक केसरकर यांचा ठाकरे गटाला इशारा : पदासाठी लाचारी कोणी केली, 4 दिवसात मी सांगणार

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
आदित्य ठाकरे यांच्या अनमॅच्युरिटी वक्तव्यामुळेच बाळासाहेबांच्या शिवसेनेत फूट पडली. अशा वाईट विचारांना उत्तरे दिली जातील, ती सौम्य भाषेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल खरी गद्दारी कोणी केली. मी पक्षाचा प्रवक्त म्हणून येत्या दोन ते चार दिवसांमध्ये पदासाठी कोणी लाचारी केली, हे मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाला दिला आहे.

कराड येथे टिळक हायस्कूल व शिक्षण मंडळ कराड यांच्या शताब्दी महोत्सावास शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांचा स्वाभिमान एकनाथ शिंदे यांनी जपला आहे, अन्यथा विकत जाणारी लोकही आम्ही पाहिली आहेत. तेव्हा आदित्य ठाकरेंनी वयाप्रमाणेच बोलावे. आदित्य ठाकरे हे वयाने लहान आहेत. अडीच वर्षात आपल्या स्वतःच्या ऑफिसमध्ये एक महिना सुद्धा गेले नाहीत. लोकाची सेवा, राजकारण आणि समाजकारण म्हणजे काय ते कधी समजू शकले नाहीत.

काॅंग्रेस व राहूल गांधीवर टीकास्त्र
जी लोक बाळासाहेबांच्या विचारापासून लांब गेली, त्याना खरोखर मदतीची गरज आहे. आमचा ठाम निश्चय हाच आह, बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरच चालणार. आम्ही एकच मागणी केली होती, हिंदू विचारांशी प्रामाणिक रहावे. परंतु काश्मीरमध्ये जावून कोणी काॅंग्रेसला पुढाऱ्यांना मिठी मारत असेल, तर त्याच्यासारखा अपमान बाळासाहेबांच्या विचाराचा असूच शकत नाही. महाराष्ट्रात येवून सावरकरांबद्दल चुकीचे शब्द काढतात, असे म्हणत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राहूल गांधी व काॅंग्रेसवर टीकास्त्र सोडले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत्ववाने केलेल्या कामाची मांडणी केली.