टीम हॅलो महाराष्ट्र | जेएनयू हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिस गुन्हे शाखेच्या SIT ने ‘यूनिटी अगेन्स्ट लेफ्ट’ नावाच्या व्हाॅट्सॅप ग्रुपच्या सदस्यांना ओळखलं आहे. या ग्रुपमध्ये एकूण ६० सदस्य होते. त्यापैकी ३७ लोकांना पोलिसांना ओळखण्यात यश आलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या सूत्रानुसार त्यातले १० लोक कॅम्पसच्या बाहेरचे होते. म्हणजे हिंसेमध्ये सामील असणारे हे १० लोक, त्यांचा कॅम्पसशी कुठलाच संबंध नाही. डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही गटांनी हिंसाचारात बाहेरच्या लोकांची मदत घेतली.
जेएनयूच्या विद्यार्थ्यांनीच बाहेरच्या दंगेखोर लोकांना आत येऊ देण्यास मदत केली होती. आता या संपूर्ण प्रकरणात जेएनयूचे सुरक्षा रक्षक देखील संशयाच्या जाळ्यात अडकत आहेत. वायरल झालेल्या विडीओमध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोषसहित ९ जणांची ओळख दिल्ली पोलिसांनी पटवली आहे. यांच्या विरोधात इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि न्यायवैद्यक पुरावे गोळा केले जात आहेत. यानंतरच त्यांना चौकशीसाठी बोलवली जाईल.