नवी दिल्ली । उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेल्या जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थिनी सफुरा जरगर हिला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मानवी आधारावर सफुरा हिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. याला केंद्र सरकारनंही समर्थन दिलं आहे. दिल्ली हिंसाचार प्रकरणातील चौकशीवर परिणाम होईल अशा कोणत्याही कृत्यात सहभागी न होण्याच्या अटीवर दिल्ली उच्च न्यायालयानं सफुरा हिला जामीन मंजूर केला आहे. तसंच तिला दिल्ली सोडण्यासाठीही मनाई करण्यात आली आहे.
सफुरा ही गर्भवती असून पोलीस कोठडीत तिला कोरोना संक्रमणाचा धोका असल्याचे तिच्या वकिलांकडून सांगितलं जात होत. मात्र, कोर्टानं तिला याआधी जामीन नाकारला होता. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (CAA) फेब्रुवारी महिन्यात उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या धार्मिक हिंसाचारात सहभाग असल्याचा आरोप सफुरावर करण्यात आला होता. दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठीच्या ‘यूएपीए’ (Unlawful Activities Prevention Act) कायद्यान्वये सफुरा हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली होती.
सफुरा हिच्या जामीन याचिकेला दिल्ली पोलिसांकडून विरोध करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या स्टेटस रिपोर्टमध्ये आरोपी महिलेविरुद्ध ठोस पुरावे असल्याचं म्हटलं. सुनियोजित योजना बनवणं आणि त्याच सहभाग घेणं, अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांत सहभाग असल्यानं तिला जामीन मिळू नये, असं मतं पोलिसांनी नोंदवलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”