दिल्लीचे भोंदू बंटी-बबली पोलिसांच्या जाळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – पती-पत्नीमधील वाद मिटवण्याची थाप मारून विधी-पूजाच्या नावाखाली रुमालात ठेवलेले साडे पाच तोळ्यांचे दागिने हातचलाखीने लांबविणाऱ्या परप्रांतीय भोंदू जोडप्याला उस्मानपुरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई वाळूज भागात शुक्रवारी करण्यात आली. अबीद रशीद आणि नगिना खान अशी अटकेतील भोंदूची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाकेरा वजीर शेख या 5 फेब्रुवारीला कपडे खरेदी करण्यासाठी शहागंज भागात आल्या होत्या. कपडे खरेदी करत असताना त्याना एक छापील पत्रक दिसले. त्यावर पती-पत्नी, कौटुंबिक वाद नये होऊ नये यावर रामबाण उपाय अशी जाहिरात होती. त्यावर क्रमांक होता. म्हणून शाकेरा यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी नागिना हिने त्यांना समस्या विचारली. त्यानंतर पूजा- विधी करावे लागतील. त्यासाठी सोबत दागिने घेऊन या असे म्हणत उस्मानपुरा भागातील जामा मस्जिद समोरील आलिशान कॉम्प्लेक्सच्या गाळा क्र. 2 येथे भोंदूनी बोलावून घेतले. 6 फेब्रुवारीला शाकेरा या तिथे गेल्या. त्यावेळी त्यांच्याकडून सर्व वयक्तिक, पारिवारिक माहिती भोंदूनी विचारून घेतली. पती-पत्नीमध्ये वाद होऊ नयेत म्हणून उपाय म्हणून एक विधी करण्यास सांगितले. त्यासाठी भोंदूनी जमिनीवर एक रुमाल अंथरला. त्यावर शाकेरा यांना दागिने ठेवण्यास सांगितले. त्यानुसार शाकेरा यांनी दोन तोळ्यांचे गंठण, तीन तोळ्यांचे दोन नेकलेस आणि पाच ग्रॅमचे कर्णफुले त्या रुमालात ठेवले. त्या रुमालाला भोंदूनी गाठ मारली. मात्र, त्यापूर्वी हातचलाखीने सर्व दागिने लांबवून रुमलावर तांदूळ, धागा ठेवला. तो रुमाल सकाळी घरी गेल्यावर उघडा असे सांगितले. त्यानंतर शाकेरा या घरी निघून गेल्या. दुसऱ्यादिवशी रुमाल उघडून पाहिले तर त्यात गव्हाच्या पिठाचा गोळा होता. दागिने दिसून आले नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गाझियाबाद, दिल्ली येथून अबीद रशीद आणि नगिना खान हे दोघे भोंदू औरंगाबादेत आले. त्यांनी उस्मानपुरा भागातील जामा मस्जिद समोरील आलिशान कॉम्प्लेक्समध्ये गाळा किरायाने घेतला. त्यासाठी दोन हजार रुपये मालकाला ऍडव्हान्स दिले. तसेच रिक्षा, बसस्थानक, रेल्वेस्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी कौटुंबिक, पती-पत्नी मधील वादावर रामबाण उपाय अशी जाहिरात पत्रके मोठ्याप्रमाणात वितरित केली. त्यानंतर शाकेरा या शहागंज येथे कपडे खरेदी करत असताना ते पत्रक पाहून संपर्क केल्याने भोंदूच्या जाळ्यात अडकल्या. त्यांचे दागिने लुटून दोघेही गाझियाबादला पसार झाले होते.