शिर्डी प्रतिनिधी | काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला. लोकशाही चांगली, सदृढ राहावी यासाठी साईबाबांना साकडे घातले, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांना दिली.
सध्या सत्तेवर जे आलेत ते राज्यघटनेमुळेच आलेत, मात्र अलीकडच्या काळात लोकशाही, राज्यघटनेतील मुलभूत तत्वांना सुरूंग लावला जात असल्याने आम्ही काळजीत आहोत. या पार्श्वभूमीवर लोकशाही चांगली, सदृढ राहावी यासाठी साईबाबांना साकडे घातले आहे असे थोरत म्हणाले आहेत.
सर्वांना सोबत घेण्याचे साईबाबांच जे तत्वज्ञान आहे तोच काँग्रेस विचार आहे. काँग्रेसचे विचार, तत्वज्ञान सर्वसामान्यांच्या अंतकरणात आहे. त्याला साद घालण्याचे काम करावे लागेल असे सांगत थोरात यांनी विश्वास व्यक्त केला की आम्हाला नक्की यश मिळेल. राजकारणातील पारंपारिक विरोधक प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व खासदार डॉ़ सुजय विखे यांनी विमानात सोबत प्रवास केल्याचे फोटो माध्यमात आले. या भेटीत त्यांची काय चर्चा झाली याबाबत दोघांच्याही समर्थकात उत्सुकता होती. त्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देतांना थोरात म्हणाले की तो केवळ योगायोग होता. याचा जास्तीचा अर्थ आपण काढू नये असे थोरात म्हणाले आहेत.