हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी मोठी लढत होत असताना अकोला जिल्हा परिषद पोट निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीने आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. या ठिकाणी वंचित बहुजनच्या 6 जागा निवडून आल्या आहेत तर राष्ट्रवादीच्या 2 आणि शिवसेना व भाजपला 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर इतरमधून 2 जागा निवडून आल्या आहेत. या ठिकाणी 14 पैकी 12 जागांचे निकाल हाती आले आहेत. तर दोन जागांचे निकाल अद्याप हाती येणे बाकी आहे.
राज्यातील मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुकीत महाविकास आघाडी, वंचीत बहुजन आघाडी, मनसे, भाजप अशा पक्षांनी आपले तगडे उमेदवार उभे केले आहेत. या ठिकाणी सध्या म्डमोजणी केली जात असून निकालही हाती येऊ लागले आहेत. पोट निवडणुकीत अकोला जिल्हा परिषद गटातील वंचीत आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
अंदुरा गटातून मीना बावणे, शिर्ला गटातून सुनील फाटकर, देगाव गट- राम गव्हाणकर आणि घुसर गट- शंकर इंगळे हे वंचित बहुजन आघाडीचे चार सदस्य विजयी झाले. तर तालुक्यात लाखपूरी गटातून सम्राट डोंगरदेव (अपक्ष), अकोलखेड गट- जगन निचळ (शिवसेना) आणि दगडपारवा गट- सुमान गावंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) या तिघांनीही विजय मिळविला आहे.