हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावेसे वाटते. पण देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा खरपुस समाचार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतला आहे. एकजण म्हणतो मी परत जाईन, तुम्हाला बोलावलंय कुणी..??”, अशा खास पुणेरी स्टाईल कोपरखळ्या अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावली आहे.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात जोरदार राजकीय फटकेबाजी केली. ‘पुन्हा येईन, परत जाईन’ अशी भाषा करणाऱ्यांना जनतेने बोलावलंच नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
“चंद्रकांतदादांना पुणेकरांनी बोलावलंच नव्हतं. त्यांच्यामुळे भाजपच्या नेत्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाला”, असंही सांगायला अजित पवार विसरले नाहीत. “बरं चंद्रकांत दादा पुण्यात आलेच आहेत तर मग एका वर्षातच परत जाण्याची भाषा का? असा सवाल करताना कोथरुडकरांनी त्यांना पाच वर्षासाठी निवडून दिलंय. उद्या जर कोथरुडकर काही काम घेऊन गेले तर मी परत जाणार आहे, असं चंद्रकांतदादा सांगणार आहेत का?”, अशी टोलेबाजी अजित पवार यांनी केली.
नक्की काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील –
पुणे असं आहे की, याठिकाणी प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्र मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेषत: मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’