कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना कराड तालुक्यातील विकासकामांना मोठया प्रमाणावर मंजुरी दिली आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कराड तालुक्यातील सुमारे ५४ कोटी ७८ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून, याबद्दल ना. फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण व राज्य सरकारचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
कराड तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजुर करावा, याबाबत डॉ. अतुल भोसले सातत्याने प्रयत्नशील होते. त्यानुसार त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून अर्थमंत्री ना. फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करुन, या कामांना मंजुरी मिळावी अशी विनंती केली होती. या मागणीची दखल घेत श्री. फडणवीस यांनी आज थेट अर्थसंकल्पात या कामांचा समावेश करुन, या विकासकामांसाठी भरीव निधीचीही तरतूद केली आहे.
अर्थसंकल्पात आज मंजूर झालेल्या विकासकामांमध्ये कराड तालुक्यातील आटके टप्पा ते रेठरे बुद्रुक रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणासह सुधारणा करणे (५ कोटी), कृष्णा कॅनॉल चौक ते बनवडी फाटा रस्ते सुधारणा (५ कोटी), आटके कटपान मळा ते गोळेश्वर रस्ते सुधारणा (३ कोटी ५० लाख), कार्वे ते कोडोली रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणासह सुधारणा करणे (३ कोटी), प्र.जि.मा. ५५ चचेगाव ते राष्ट्रीय मार्ग १४८ रस्ते सुधारणा (३ कोटी), कालेटेक फाटा – नांदगाव ते साळशिरंबे रस्ते सुधारणा (२ कोटी ८० लाख), कालेटेक कमान ते काले रस्ते सुधारणा (२ कोटी), काले गावातील रस्त्याचे नुतनीकरण करणे (१ कोटी ५० लाख), रेठरे बुद्रुक ते खुबी ते कृष्णा कारखाना रस्ते सुधारणा (१ कोटी ३० लाख) यासह इंदोली गावाजवळ उंच व मोठ्या पुलाचे बांधकाम (१६ कोटी), उंब्रज – अंधारवाडी – चोरे – मरळी – पाल रस्ता प्रजिमा – ६० मधील कि.मी. १३ ते २२ चे रुंदीकरण व इतर सुधारणा (७ कोटी २० लक्ष), पार्ले बाह्यवळण रस्त्याचे काम (७ कोटी), पाटण तालुका सीमा ते शेणोली स्टेशन रस्ता राज्य मार्ग १४८ चे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे (४८ लाख) अशा एकूण ५४ कोटी ७८ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कराड तालुक्यातील या महत्वपूर्ण कामांना मंजुरी मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. तसेच या कामांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याने ही कामे लवकरच मार्गी लागण्याची आशा व्यक्त केली जात आहे.